!DOCTYPE html>
आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? तर अन्न वस्त्र आणि निवारा. अन्न त्यातला प्रमुख घटक. आपली संस्कृतीच मूळात आहे“अन्न हे पूर्णब्रह्म” ह्या संस्कारांची.
मात्र काळाच्या ओघात आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले, प्रगतीच्या नावाखाली हळूहळू पारंपरिक सवयी बदलत गेल्या, ह्याचा परिणाम आपल्या वेशभूषा आणि आधुनिक विचारांखेरीज खाण्यापिण्याच्या सवयीवरही झाला.जे येणार्या काळात मानवजातीला मुळीच परवडणारे नाहीयेत. हयातलाच एक तोटा म्हणजे, तोटा नव्हेच खरंतर ही मोठीच समस्या आहे, ती म्हणजे अन्नाची नासाडी. आपण कचर्यात टाकलेले अन्न जेव्हा कचर्याच्या ढीगात जाऊन पडते तेव्हा तिथे कुजून त्यातून अनेक हानिकारक वायु बाहेर पडतात आणि मोठ्या प्रमाणावर वातावरण प्रदूषित करतात ज्याचा त्रास आपल्यालाच होतो.
आज केवळ मोठ्या समारंभातच नव्हे तर घरोघरी अन्नाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होताना दिसू येते, जे निश्चितच वाईट आहे.
तशी तर प्रत्येकच गृहिणी अन्न वाया जाऊ नये ह्या प्रयत्नात असते. मात्र कधीकधी कामाच्या भानगडीत किंवा कुठल्याही इतर कारणाने असे प्रसंग उद्भवतात जेव्हा उरलेल्या अन्नाचे काय करावे हा प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभा असतो.
अन्नाची नासाडी भयंकार आहे आणि असे घडायला नकोय, त्यासाठी खालील उपाययोजना आपण करू शकतो:
बरेचदा आपण बाहेर असताना खाण्याचं सामान किंवा भाजी घेतो व नंतर लक्षात येतं की हे आधी फ्रीज मध्ये पडलेल होतं. त्यामुळे सामान तर वाया जातेच वर पैसे सुद्धा जातात. अशावेळी, आपण जेव्हा बाहेर असतो किंवा बाजारात खाण्याच्या सामानाची खरेदी करण्यासाठी बाहेर पडतो त्यावेळी घरात खाण्याच्या पदार्थांची किंवा भाजीची यादी करा म्हणजे उगाच जास्तीचं काही घेतलं जाणार नाही.
बाजारातून आणलेले अन्नपदार्थ आणि भाज्या नीट साठवा जेणेकरून ते खराब होणार नाहीत. उरलेले अन्नपदार्थ बाहेर न ठेवता नीट झाकून फ्रीज मध्ये ठेवा, फळभाज्या नीट धुवून साठवा आणि पालेभाज्या निवडूनच साठवा.पालेभाज्या धुवून साठवल्या की जास्त टिकत नाहीत.
पूर्वी जास्त स्वयंपाक झाला की हातात अन्नपूरना आहे असं म्हणत त्यावेळी घरी येणारे जाणारे असल्यामुळे मग ते जास्त राहिलेले अन्न वाया जात नसे. परंतु आधुनिक काळामुळे उरलेले अन्न वाया जाते. आपल्या रोजच्या जेवणाचा आपल्याला अंदाज असतोच,त्यानुसारच स्वयंपाक करा किंवा बाहेरून ऑर्डर करा जोडीला फळं वगैरे ठेवा म्हणजे चुकून कमी पडल्यास उपाशी न राहता वेळ निभावता येईल आणि काही वायाही जाणार नाही.
आतापर्यंत आपण घरात वाया जाणार्या आणणाबद्दल बोललो मात्र कार्यक्रमात वाया जाणार्या अन्नाचे काय? तिथे तर प्रचंड प्रमाणात नासाडी होते. आपण घरात असू वा बाहेर ताटात तेवढेच अन्न वाढून घ्या जेवढे तुम्हाला संपवता येईल.ऊष्टे म्हणून ते कोणाला दिलेही जात नाही आणि नंतर त्याची रवानगी थेट कचर्यात होते, अशावेळी आधीच वाढून घेताना जेवढे संपवता येईल तेवढेच वाढून घ्या.
तुम्हाला माहिती आहे का, रोजच्या स्वयंपाकातल्या भाज्या निवडताना निघणारी साल आणि देठ, कुजलेली पानं ह्यांचा वापर करून तुम्ही कंपोस्ट तयार करू शकता जे तुमच्या बागेतील झाडांसाठी संजीवनी आहे.
ज्या ठिकाणी Buffet Dinner पद्धतीचा अवलंब केला जातो तेथे पदार्थ अन्न वाया जाणार नाही याची खबरदारी नक्की घ्या. आपण जेवढे खाऊ शकतो तेवढेच पदार्थ ताटात वाढून घ्या. शक्य असल्यास ताटात वाढण्याच्या पदार्थांची यादी ५-६ पदार्थांपेक्षा जास्त नसावी. जेणेकरून अन्न वाया जाणार नाही.
लग्नसमारंभात तळलेल्या व इतर खाण्याचे पदार्थ यांचा काही प्रथांच्या नावाने नासधूस करणे आपण सर्वांनी टाळले पाहिजे.
लग्नसमारंभात विवाह सोहळ्याप्रसंगी वापरल्या जाणाऱ्या तांदळाच्या किंवा अन्नधान्य वापर करून तयार केलेल्या अक्षदावजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर आपण करू शकतो.